पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून सावकारी रक्कमेवर प्रतिमहिना 50 टक्के व्याज घेणारा आणि खंडणीची मागणी करणार्या बाबा बोडके टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 ने अटक केली आहे. निलेश श्रीकांत जोशी (40, रा. सारंगा टेरेस, फ्लॅट नं. 11, सर्व्हे नं. 12/1/2, आनंदनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला निलेश श्रीकांत जोशी हा कुख्यात बाबा बोडके टोळीचा सदस्य आहे. त्याच्याविरूध्द गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. निलेश जोशीने सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान एका बांधकाम व्यावसायिकास अवैधरित्या 25 लाख रूपयांचे कर्ज दिले होते. रक्कमेवर प्रतिमहिना 50 टक्के व्याज म्हणून दि. 22 नोव्हेबर 2021 रोजी दरम्यान 50 लाख रूपये परत देण्याबाबत निलेश जोशीने नोटराईज समजुतीचा करारनामा करून घेतला होता. त्यामध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने 25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रूपये दि. 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत देण्याचे कबुल केले होते.
मुदतीत पैसे दिले नाही तर संबंधित फिर्यादी (अर्जदार) कोथरूड येथील 1200 स्क्वेअर फुटचा ताबा देण्यात येईल असे समजुतीच्या करारनाम्यात लिहुन घेण्यात आले होते. घेतलेले पैसे परत देऊ न शकल्यामुळे निलेश जोशीने फिर्यादीकडे पैशासाठी तगादा लावला. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर वेळावेळी फोन करून शिवीगाळ केली तसेच दमदाटी करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बरे वाईट करण्याची धमकी दिली. होणार्या त्रासाला कंटाळून संबंधिताने गुन्हे शाखेच्या खंडणीच विरोधी पथक – 2 यांच्याकडे संपर्क साधून तक्रार दिली. खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी निलेश श्रीकांत जोशी याच्याविरूध्द अर्जदाराने फिर्याद दिल्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यास अटक केली.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,
सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, प्रविण पडवळ, चेतन शिरोळकर, मोहन येलपले आणि महिला अंमलदार आशा कोळेकर यांनी केली आहे.