पिंपरी : शासकीय ठिकाणी नवीन अधिकारी आले आणि त्यामध्ये शहरातील सर्वात वरच्या ‘पोस्ट’चा अधिकारी बदली होऊन आला की शुभेच्छा देण्यासाठी रांग लागलेली पाहायला मिळते. शहरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, मित्र मंडळी आणि त्यांच्याच खात्यातील अधिकारी पुष्पगुच्छ, हार, भेटवस्तू घेऊन रांगेत असतात. अनेक अधिकारी हे सर्व स्वीकारतात. मात्र काही अधिकारी याला अपवाद ही ठरू शकतात.
याचाच प्रत्यय सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पाहायला मिळत आहे. राज्य पोलीस दलात चार दिवसांपुर्वी मोठे फेरबदल करण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली.
बदल्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच लगेच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना स्वतः मला भेटायला यायची आवश्यकता नसल्याचे सांगितले. तसेच मी स्वतः आपल्या पोलीस ठाण्यात येऊन भेट घेतो असा निरोप दिला.
नवीन पोलिस आयुक्त शहरात रुजू झाल्याचे समजताच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी आयुक्त शिंदे यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू घेऊन आयुक्तालयात पोहचले. आयुक्तांना भेटून पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देऊन शुभेच्छा देत असताना आयुक्तांनी त्यास नकार दिला. मला शुभेच्छा देताना कोणत्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ, भेटवस्तू स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच येऊन फक्त शुभेच्छा द्या असे सांगितले.
यामुळे पाहिल्याचं आयुक्तालयात येताना ही आणि जातानाही नागरिकांच्या हातात पुष्पगुच्छ, भेटवस्तू पाहायला मिळाली.