मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची सांगितले. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही असं सांगत त्यांनी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
“मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली असल्याचं म्हटलं आहे. गाडीचं स्टेअरिंग जॅम झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का ? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही,” असं सांगत फडणवीसांनी आक्षेप नोंदवला.
यानंतर अनिल देशमुख यांनी ही गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची नव्हती असं पुन्हा एकदा सांगत इंटिरिअरसाठी यांच्याकडे देण्यात आली होती, मात्र बिल थकल्याने गाडी ताब्यात ठेवण्यात आली होती असं सांगितलं. तसंच हात बांधण्यात आले नव्हते असं सांगत महाराष्ट्र, मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं. फडणवीसांनी यावेळी पोलिसांच्या आणि गृहमंत्र्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचा आरोप केला. हे कोणाला वाचवण्यासाठी सुरु आहे ? अशी विचारणादेखील त्यांनी केली.