नवी दिल्ली ः भारताला करोना विषाणुची लस लवकरच मिळेल आणि आपण महामारीवर नियंत्रण मिळवू शकू. तसेच या आर्थिक युद्धात आपल्याला विजय मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, ”जगातील बहुतेक देश चीनसोबत काम करण्यास इच्छूक नाहीत, त्यांना भारतासोबत काम करायचे आहे.”
डन अँड ब्रैडस्ट्रीटच्या एका ऑनलाइन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले की, ”केंद्राद्वारे कंपन्यांसाठी घोषीत करण्यात आलेल्या तीन लाख करोड रुपयांमधील १.४८ करोड रुपयांचे वितरण झालेले आहे. केंद्राने चीनकडे होणारी आयात कमी केली आहे आणि निर्यात वाढविली आहे. आतापर्यंत तरी सकारात्मक परिणाम दिसत आहेत आणि इथून पुढचे परिणामदेखील चांगले असतील, अशी खात्री आहे.”
”कच्च्या तेलांच्या आयातीवर भारताला अवलंबून राहावे लागत होते. ते परावंलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच सद्या खादी आणि ग्रामोद्योग यांची वार्षिक उलाढाल ८० हजार करोड रुपयांची आहे. ती उलाढाल पुढील २ वर्षांमध्ये पाच लाख करोड रुपयांवर नेण्यासाठी सरकार नियोजन करत आहे”, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.