पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना रघुनाथ कुचिक यांनी नोटीस बजावली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांना पाठवलेली नोटीस त्यांना आज सकाळी मिळाली आहे. वाघ यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
या गुन्ह्यात न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असून चित्रा वाघ या माझी बदनामी करत आहेत. त्यांनी माझ्या अब्रुनुकसानीची भरपाई द्यावी. तसेच यासंदर्भात आपण वाघ यांच्याविरुद्ध दिवाणी व फौजदारी दावा दाखल करणार आहोत, असे कुचिक यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये नमूद केले आहे. कुचिक यांनी ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांच्या मार्फत ही नोटीस पाठवली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करुन माहिती देताना लिहिले आहे की, शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कार पिडीतेने काल माझ्यावर आरोप केले की चित्रा वाघ यांनीच हे सगळं घडवून आणलं.. आणि आज सकाळीच कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली. तर दुसरीकडे चित्रा वाघवर कसा गुन्हा दाखल करता येईल यावर खलबतं सुरु आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग नाही का ? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.