पुणे : राज्यातील पेपर फुटीचे सत्र सुरुच असून, आता पुणे पोलिसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनीदेखील पेपरफुटीचे प्रकरण समोर आणले आहे. यासाठी आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने महत्वाची भूमिका बजावली. या संयुक्त कारवाईत निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या माजी सैनिकांनी लष्कराच्या एका विभागातील व्हेईकल मेकॅनिक या पदाच्या भरतीचा पेपर फोडल्याचे तपासात समोर आले आहे.
आर्मी इंटिलिजन्स ब्युरोला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ४ जानेवारीला रक्षक चौकात सापळा रचला होता. गजानन मिसाळ आणि धनंजय वट्टमवार यांना तिन्ही आरोपींनी संगनमत करून भरतीचे आमिष दाखवले होते. लष्कराच्या जीआरईएफ विभागातील व्हेईकल मेकॅनिक पदासाठीच ही भरती होणार आहे. त्या पदाच्या भरतीसाठीची पाच लाख रुपयांची बोली ठरली होती. त्यानुसार पहिली टोकन रक्कम पिंपरी चिंचवड परिसरात स्वीकारली जाणार होती. तीच सत्तर हजारांची रक्कम स्वीकारताना आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने त्यांना ताब्यात घेतले. मग पिंपरी चिंचवड पोलिसांना पाचारण करून त्यांना अटक करण्यात आली.
१० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
न्यायालयाने आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या तिघांकडून लष्कर भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता ३१ ऑक्टोबरला झालेल्या भरतीचा पेपर फोडण्यात आल्याचे समोर आले. माजी सैनिकांकडे हे पेपर नेमके आले कुठून? याचा छडा लावण्याचे आता मोठे आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे.