पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट लिमिटेड कंपनीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीतील झोलबाबत महापालिका सभागृहात बुधवारी पाच तास चर्चा केली.
आता भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचे सांगत असणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्र लिहून भाजपच्या ताब्यातील महापालिकेतील स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची माहिती दिली. यामध्ये 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा करत या प्रकरणी तुम्ही ईडीकडे चौकशीची मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल, अशी अपेक्षा राऊत यांनी केली.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या रोज महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवतात. ईडी’कडे तक्रारी करतात. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांनाच पत्र लिहून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दोन पत्रे सोमय्यांना लिहिली आहेत. ते ट्वीट करून या प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणीच राऊत यांनी सोमय्यांकडे केली आहे.
राऊत पत्रात म्हणतात, “तुम्ही दररोज वेगवेगळे आरोप करत असतात. त्यामुळेच एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. माझ्या पिंपरी-चिंचवडमधील दौ-यात काही नेत्यांनी मला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली. त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्रे हाती लागली. त्यानुसार 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, टेंडर आणि यातील कंडिशन क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आली.
‘या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी 50 टक्के सुद्धा काम केले नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीची मागणी करा. भष्टाचार म्हटले की लोकांना तुम्हीच आठवता. ही फाईल मी ईडीला देण्याएवजी तुम्हाला देत आहे. कारण, तुम्ही दिलेल्या तक्रारीवर एजेंसी काम करतात. तुम्हाला धन्यवाद! कारण तुमच्यामुळे अनेक अधिकारी आणि नेते जेलमध्ये गेले आहेत. तुम्ही त्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आणि कागदपत्र तुम्हाला देतो. या कंपनीने मोठा गैरव्यवहार केला. या प्रकरणी तुम्ही ईडीकडे चौकशीची मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल, अशी अपेक्षा खासदार राऊत यांनी व्यक्त केली.