मुंबई ः शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते म्हणून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशी वेशभूषा करावी, असा आदेश आता राज्य शासनाने जाहीर केला आहे.
त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू झालेला आहे. त्याबाबत सरकारी कार्यालयात कोणते कपडे घालावेत आणि कसे घालावेत, याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.
त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे…
१) गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.
२) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.
३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.
४) कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये
५) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला कर्मचार्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.
६) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.