नवी दिल्ली ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २६ जानेवारीला राजपथवर शेतकरी मोर्चा काढू. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातून एका सदस्याला पाठवावे, असे आवाहान स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे. त्याचबरोबर २३ जानेवारीला प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांनी राज्यपालांच्या निवासस्थानावर धडक देण्याचेही आवाहन यादव यांनी केले आहे.
मागील ३८ दिवसांपासून केंद्राने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाबचा शेतकरी कुडकुडणाऱ्या थंडीत आंदोलन करत आहेत. तरीही केंद्र सरकार शेतकऱ्यांचा मागण्या मान्य करायला तयार नाही. केंद्र आणि शेतकरी यांच्यातील बैठकांमधून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी २६ जानेवारीला राजपथवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
शेतकरी आंदोलनावर हसन मुश्रीफ म्हणाले
पिकांना हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करार शेतीची भीती वाटत आहे. त्यामुळेच, शेतकरी काळ्या कायद्याच्या विरोधात गेले महिनाभर थंडी वाऱ्याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा मागण्या मान्य करून त्यांच्यावर दया दाखवावी आणि हे आंदोलन संपवावे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मत व्यक्त केलेले आहे.