मुंबई : विद्यार्थ्यांना 2020-2021 हे वर्ष पूर्णपणे घरूनच शाळा करावी लागली तर 2021-2022 याही वर्षाची सुरुवात घरूनच झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होऊ लागली आहे. यामुळे ऑफलाईन शाळा कधी सुरु होणार याकडे विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन 15 ऑगस्टपासून तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगित
पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा मार्च 2020 पासून सुरूच झाली नाही. तर सहावी ते आठवीचे वर्ग मागच्या वर्षी काही दिवसांसाठीच सुरू झाले. त्यामुळे शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शाळांमधील गर्दी पाहून मुले भेदरतील, वर्षभर मुले घरीच असल्याने त्यांच्यातील अभ्यासाची सवय मोडत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांना डोळ्याचा त्रास सुरू झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.
ऑनलाइन शिक्षणापासून 26 टक्क्यांहून अधिक मुले वंचितच आहेत. या पार्श्वभूमीवर ऑफलाइन शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणसंचालकांनी व्यक्त केले. त्याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता टिकणार तथा वाढणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी तर दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी आणि तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांचे वर्ग सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
ऑनलाइन शाळा मंगळवार पासून (ता. 15) सुरू झाल्या असून काही महिन्यांत स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन शासनस्तरावर आहे. दरम्यान, दहावी व बारावीच्या वर्गातील सर्वच शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती बंधनकारक असून पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना 50 टक्क्यांच्या प्रमाणात उपस्थिती बंधनकारक असेल.- डॉ. दत्तात्रय जगताप, शिक्षण संचालक, पुणे