अहमदनगर ः आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण सगळेच पत्ता शोधायचा असेल तर, आपल्या मोबाईलवरील गुगल मॅप काढतो. पण, तेच मॅप आता एकाच्या जीवावर बेतलं आहे. पिंपरी-चिंचवडच्या तीन उद्योजकांना गुगल मॅपने रस्ता दाखवत-दाखवत सरळ त्यांची गाडी धरणात घातली. त्याच एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण सुदैवाने पोहोत बाहेर आले आहेत.
ही घटना अहनदनगरमधील अकोले तालुक्यात घडली आहे. हे तीन उद्योजक आठवडच्या शेवटी कळसूबाई शिखर ट्रेकिंगसाठी निघाले होते. गुरू सत्याराज शेखर (वय-४२), समीर राजूरकर (वय-४४) आणि वाहनचालक सतीश सुरेश घुले (वय-३४) हे आपल्या चारचाकीमधून गुगल मॅपचा आधार घेत निघाले होते.
गुगलने जवळचा रस्ता म्हणून कोतूळहून अकोलेकडे जाणारा रस्ता दाखविला. वास्तविक हा रस्ता पावसाळ्यात बंद असतो. कारण त्यावरील पूल पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याखाली जातो. स्थानिक लोकांना याची माहिती असल्याने त्या रस्त्याने कोणी जात नाही. सध्याही या पुलावर सुमारे २० फूट पाणी आहे. एक तर अंधार आणि रस्त्याची माहिती नाही. त्यामुळे गुगल मॅपवर विश्वास ठेवत घुले यांनी गाडी पुढे नेली. मात्र, ती थेट खोल पाण्यात गेली. गुरू शेखर व समीर राजूरकर यांनी कारमधून बाहेर पडत कशीबशी आपली सुटका करून घेतली. सतीश घुले यांचा मात्र मृत्यू झाला.