मुंबई ः सोशल मीडिया आणि इतर प्रसार माध्यमांतून भाजपा शिवसेनेवर आणि दै. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना भाजपावर एकमेकांवर चांगलेच तुटून पडत आहेत. शिवसेना आणि भाजपाची टीका-प्रतिटीका, आरोपप्रत्यारोप राजकीय वर्तुळात चांगलेच रंगलेले दिसत आहेत. तर, दै. सामनातील लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्याबद्दल संपादक रश्मी ठाकरे यांनी पत्र लिहिणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यासंबंधी खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, “अरे बापरे! ताबडतोब… लगेच! मला आता त्यांची भीती वाटतेय… ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
औरंगाबाचे नामांतरण संभाजीनगर करण्यावरून भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर काही प्रश्न उपस्थित करत पलटवार केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपा आणि शिवसेना एकमेकांसमोर उभा टाकली आहे, हे मात्र नक्की.