पिंपरी : गेली अनेक दिवसांपासून बंद असलेले सोनसाखळी चोरीचे गुन्हे पुन्हा सुरू झाले आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातून 63 हजारांचे, तर संत नगर, स्पाईन रोड येथे कुटुंबासोबत घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांचे गंठण चोरट्यांनी चोरून नेल्याचा घटना घडल्या आहेत.
राजेंद्र किसन पवार (44, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांच्या पत्नी त्यांच्या भावाला भेटून पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून घरी जात होत्या. रात्री सव्वानऊच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील 63 हजार 497 रुपयांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले.
पूजा संतोष शिंदे (33, रा. खंडोबा माळ, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे त्यांचे पती आणि मुलांसोबत मंगळवारी रात्री स्पाईन सिटी मॉल येथे नाष्टा करण्यासाठी आले होते. घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी शिंदे यांच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.