मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रावाना झाला. पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला निघाले आहेत. सायंकाळी साडे चारच्या सुमारास वाकड येथुन ताफा मार्गस्थ झाला आहे.
मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने गेला आहे. मुख्यमंत्री आज मध्यरात्री पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढीच्या पुजेआधी होणाऱ्या पुजेसाठीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होती. रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्या सोबत पोलिसांच्या बऱ्याच गाड्याही आहेत. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या ताफ्यासोबत असणाऱ्या वाहनांची माहितीही सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलीय.
मागील वर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले शासकीय पुजेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली होती. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आठ ते नऊ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील वर्षी अशाचप्रकारे रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली होती. अशाचप्रकारे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले आहेत.
करोनाच्या सुरूवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःच गाडी चालवत मंत्रालय आणि इतर भेटींच्या ठिकाणी जाताना दिसून आलं. मंत्रालयात होणाऱ्या बैठकांनाही मुख्यमंत्री स्वतःच गाडी चालवत हजर राहतात. मे मध्ये आमदारकीची शपथ घेतली. त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळीही ते स्वतः गाडी चालवत असल्याचं बघायला मिळालं होतं.