मुंबई : राज्यात अनलॉकच्या घोषणेनंतर गोंधळ उडाला असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला आहे.
“ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. राज्यात एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. लॉकडाउनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटलं झालं सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं आहे.