पिंपरी : भाजप सरकार ईडीचा चुकीचा वापर करत आहे. एक दिवस ही ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य लिहून घ्या,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर हल्ला केला.
शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
यावेळी धनंजय मुंडे यांनी जातीयवाचक नावं हटवण्याच्या निर्णयाबाबतही भाष्य केलं. “जी जातीयवाचक नावं सरकारी रेकॉर्डवर आहेत ती पहिले काढली पाहिजेत असा प्रस्ताव आपण समोर आणला. तो प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यानंतर जो नियम केला जाईल त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या जातील,” असंही ते म्हणाले.
“शरद पवार यांचं आयुष्य महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेच्या विकासासाठी गेलं आहे. ज्या जबाबदारीमध्ये आम्ही आहोत आमच्या विभागामार्फत जनतेच्या उपयोगी योजना त्यांच्यासमोर आणणं सामान्य व्यक्तींचा फायदा होणं ही सर्वात मोठी भेट शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असू शकते,” असंही मुंडे म्हणाले.