एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाशी, तर गुन्हे शाखेचे निरीक्षक आर.सी.पी. पथकाशी संलग्न
पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. दोन पोलीस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांना नियंत्रण कक्ष आणि आरसीपी पथकाशी संलग्न केले आहे. याबाबतचे आज रात्री उशिरा आदेश काढण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलेले आहे. त्याच्या जागी पिंपरी वाहतूक विभागाचे निरीक्षक रंगनाथ उंडे यांची तात्पुरत्या स्वरूपात बदली केली आहे. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक शैलेश गायकवाड यांना आरसीपी पथक येथे संलग्न केले असून त्याचा अतिरिक्त पदभार गुन्हे शाखा युनिट 1 चे निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
आळंदी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक इकबाल इस्माईल शेख आणि अशोक नागु गांगड या दोघांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त यांनी प्रशासकीय कारणास्तव आस्थापना मंडळाच्या मान्यतेने चार अधिकाऱ्यांना संलग्न केले असल्याचे आदेशात म्हटले आहे. निगडीचे वरिष्ठ निरीक्षक जवादवाड यांचा कार्यकाळ संपलेला होता. तर दोघांना कामकाजात हलगर्जीपणा केल्याने तत्काळ संलग्न केल्याचे बोलले जात आहे. पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.