मुंबई: गीता रीन्यूबल एनर्जी या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 3600 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 29 जूनला गीता रीन्यूबल एनर्जीच्या समभागाची किंमत अवघी 5.50 रुपये इतकी होती. मात्र, आज एक वर्षानंतर या समभागाने 194.15 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. 30 जुलैला तर या समभागाने 203.85 रुपयांचा सार्वकालिक उच्चांकही गाठला होता. त्यामुळे शुक्रवारी भांडवली बाजारात 5 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर या समभागाला अप्पर सर्किट लागला होता.
याचा अर्थ गेल्यावर्षी 29 जूनपूर्वी तुम्ही या समभागात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 37 लाखांवर पोहोचली आहे. यंदाच्या जून तिमाहीत गीता रीन्यूबल एनर्जीने चांगला नफाही कमावला आहे. 2010 मध्ये तामिळनाडूत या कंपनीची स्थापना झाली होती. सप्टेंबर 2017 पासून ही कंपनी तोट्यात होती. केवळ 2021 च्या मार्च तिमाहीत या कंपनीने 15 लाखांचा नफा कमावला होता. त्यामुळे या कंपनीची वाटचाल काहीशी संशयास्पदही असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या कंपनीचे तब्बल 11.08 लाख शेअर्स 4191 गुंतवणुकदारांच्या ताब्यात आहेत. यापैकी 3947 गुंतवणुकदारांकडे कंपनीचे तब्बल दोन लाख समभाग आहेत.
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.