राष्ट्रवादीच्या खासदार, आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी

0
मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यमंत्री सर्व खासदार, आमदार, एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री रिलीफ फंडात संकटग्रस्त लोकांसाठी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सरकार आपल्यापरीने मदत करेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणखी मदत देता येईल का याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब सर्वांशी चर्चा करुन घेत आहेत. त्यामुळे एक- दोन दिवसात नेमकी मदत काय देणार आहे हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.
आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूराने कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी झाली आहे. दरड कोसळून जवळपास २५१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यासह मुंबई, पुणे, अमरावती याठिकाणीही पूराने परिस्थिती अवाक्याबाहेर गेली होती. या नुकसानग्रस्त लोकांना एसडीआरएफच्या नियमानुसार मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पूरग्रस्त दौर्‍यावर आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी यांची मदत घेऊन बचाव कार्य सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले. या घटनेत ज्यांचा जीव गेला आहे त्यांना ५ लाख रुपयांची घोषणा राज्यसरकारच्यावतीने करण्यात आली आहे. मुंबईत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांनाही पैसे वाटप झाले आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
या महापुराने घरं उध्वस्त झाली. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले शिवाय शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली. येत्या कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल असेही नवाब मलिक म्हणाले. संकटे येतात त्यावेळी सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी असते एकसंघ येऊन मदत करण्याची परंतु मुख्यमंत्री केंद्र सरकार मदत करत आहे हे सांगत आहेत यामध्ये ते कोणतेही राजकारण करत नाहीत. मात्र भाजपचे नेते नको ती भाषा करत आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांचे चिरंजीव ट्वीट करुन जी भाषा वापरत आहेत ते योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
नारायण राणे हे पूरग्रस्तठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्री पदाच्या वेटींगमध्ये आहोत असे वक्तव्य करत आहेत. सर्वांनी संकटकाळात मदत केली पाहिजे मात्र भाजपचे केंद्रीयमंत्री असं बोलतात हे योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.