जामिनासाठी बोगस कागदपत्रे तयार करणा-या टोळीतील एकास अटक

0

पुणे : बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून त्याआधारे आरोपींना जामिनावर सोडण्यास मदत करणा-या राज्यभर सक्रिय असलेल्या रॅकेटमधील एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यावर अशाच प्रकारचे आणखी गुन्हे दाखल आहेत.

जयभीम भालेराव (वय २७) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया सुदामराव पंढरकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी हे आपापसांत संगनमत करून शिवाजीनगर, लष्कर, पिंपरी यासह अन्य न्यायालयात चोरी, घरफोडी, दरोडा, बाल लैंगिक अत्याचार या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस आधारकार्ड, रेशन कार्ड, खोटे सातबारा उतारे, खोटे शिक्के असे बनावट कागदपत्रे जमा करून देत. त्याआधारे या आरोपींना जामीन मिळत असे. त्यातून अनेकदा न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भालेराव याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बनावट कागदपत्र त्याने कोठे तयार करून घेतले?, त्याने अशा प्रकारे आणखी कोणत्या न्यायालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन दिला आहे का?, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने त्याला ३० मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.