पुणे : ओव्हरटेक करण्यासाठी कारला साईइ दिली नाही म्हणून एकास दांडके आणि दगडाने डोक्यात मारहाण करून खून केल्याप्रकरणात एकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला.
दगडू ऊर्फ सुभाष अशोक सांडभोर (वय ३०, रा. मावळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे. शुभम विलास डोंगरे (वय 27, रा. जांभुळ, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ प्रशांत (वय 24) हा घटनेत जखमी झाला आहे. त्यांच्या आईने वडगाव मावळ पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. 20 जानेवारी रोजी मावळ तालुक्यातील जांभुळ गावात हा खून झाला होता.
फिर्यादींच्या दोन्ही मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये शुभम याचा मृत्यू झाला आहे. सुनील शिंदे याच्या कारला साईड न दिल्याने ही मारहाण करण्यात आली. सुनील, दगडूसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दगडू याने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला.
यास अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी विरोध केला. या गुन्ह्यात आणखी तिघांना अटक करण्यात आलेली नाही. तो घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना रेल्वे गेटजवळ झाली आहे. त्यावेळी रेल्वे येणार असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली आहे. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्याला साक्षीदाराने ओळख परेडमध्ये ओळखले आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यची मागणी ॲड. आगरवाल यांनी केली. वडगाव मावळचे पोलिस उपनिरीक्षक एस. सी. चामे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.