कसाबला फासावर चढविण्यासाठी राबवले ‘ऑपरेशन-एक्स’

0

मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ मध्ये पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. यात १७५ जणांचा मृत्यू तर ३०० वर लोक जखमी झाले. त्याला आज १४ वर्षे पूर्ण होत आहे. या हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याला ४ वर्षांनंतर फासावर लटकावण्यात आले. मात्र, त्याला फाशीस्तंभापर्यंत नेणे सोपे नव्हते. त्यासाठी राबविलेले ऑपरेशन-एक्स अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. फाशीच्या २७ तासांआधी त्याला ऑर्थररोड जेलमधून काढले. मध्यरात्री १ वाजता पोलिस फोर्स १५० किमीवर असलेल्या येरवडा कारागृहाच्या दिशेने निघाला. वाहनात बसलेला कसाब अन् सुरक्षा पुरविणारी यंत्रणा फाशीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती. या ‘टॉप सिक्रेट’ ऑपरेशनची माहिती प्रशासनाने खुली केली आहे. ऑपरेशनचे प्रमुख राहिलेले पोलिस अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत…

ऑपरेशनचे प्रमुख प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितला अनुभव : जेलमधून काढल्यावर कसाबला कळू नये म्हणून संपूर्ण रस्त्यात बोलण्यात गुंतवून ठेवले

गोपनीय आदेश मिळाला : कोर्टाचा निकाल व दया याचिका फेटाळल्यामुळे अतिरेकी मोहंमद अजमल अमीर कसाबची फाशी निश्चित झाली. मुंबई पोलिसांना कसाब याला फाशीसाठी मध्यवर्ती येरवडा कारागृहात तातडीने हलविण्याचा गोपनीय आदेश मिळाला होता. तत्कालीन सहपोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी ऑपरेशन एक्ससाठी माझ्यावर जबाबदारी सोपविली. तेव्हा मी परिमंडळ १२ चा उपायुक्त होतो.

दिवे नसलेल्या तीन स्कॉर्पिओचा ताफा: निर्णय झाल्यानंतर आम्ही अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. आदेशाप्रमाणे मध्यरात्री १ वाजता कसाबला घेऊन फोर्स – १ कमांडोंचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. साधा वेष अन दिवे नसलेल्या तीन स्कॉर्पिओचा ताफा मुंबई-पुणे महामार्गावर होता. ताफ्याच्या दोन किमी मागे व पुढे एसआरपीची दोन प्लॅटून ठेवण्यात आल्या होत्या. शस्त्र व दारुगोळांनी युक्त कमांडो, एसआरपी जवानांनाही वाहनात कसाब असल्याचे अन् वाहन कुठे जात असल्याची माहिती नव्हती. कसाबला ‘तुझी प्रकृती खराब असल्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेत आहोत,’ असे कारण सांगण्यात आले होते. तपास अधिकारी रमेश महाले यांनी संपूर्ण रस्त्यात कसाबला बोलण्यात गुंतवून ठेवलेले होते.

सुरक्षेसाठी प्रवासाचे होते सहा टप्पे : ताफ्याला अडसर नको म्हणून मार्गावरील पुणे शहर, ग्रामीण व रायगड पोलिसांना केवळ ट्रॅफिक काढण्याचीच ड्यूटी देण्यात आली होती. सुरक्षेसाठी प्रवासाचे सहा टप्पे करून ठरलेला पासवर्ड वरिष्ठांना वेळोवेळी कळवला जात होता. अधिकारी दाते सतत संपर्कात होते. सलग ३ तास प्रवासानंतर पहाटे ४ वाजता अजमल कसाब याला येरवडा कारागृहाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर २४ तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर २०१२ रोजी अजमल याला फासावर चढवण्यात आले. काय घडले त्या रात्री : वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविली होती. रात्री ८ वाजता अधिकारी मला बोलविण्यात आले होते. ‘बॅगा तयार ठेवा, दोन तासांत बोलवितो, घरीही सांगू नका,’ अशी सूचना केली होती. प्रवासात अजमल कसाब शांत होता. येरवडा कारागृहात आल्यानंतरही कमांडो ताफा अनभिज्ञ होता. प्रवासामुळे त्यांना विश्रांतीची सूचना केली गेली. तत्पूर्वी सर्वांचे मोबाइल एकत्र जमा करण्यात आले. कोणीही बाहेर पडायचे नाही, असा आदेश झाला. कसाबच्या फाशीनंतर ताफ्यातील कर्मचाऱ्यांना वाहनात कसाब होता याची माहिती झाली.

पासवर्ड होता रीच फॉर फॉक्स : सहा पासवर्ड ठरले होते. त्यापैकी ‘स्टार्टेड टू अल्फा’ अर्थात ऑर्थररोड कारागृहातून रवाना हा पहिला पासवर्ड होता. येरवडाला पोहचल्यावर शेवटचा पासवर्ड ‘रिच फॉर फॉक्स’ हा अधिकारी दाते यांना पाठविण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.