पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी तुफान राडा घातला. यामुळे आज झालेल्या सभेत येताना विरोधी पक्षातील सदस्यांनी हटके एंन्ट्री करत सर्वांचे लक्ष वेधले. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी हेल्मेट घालून ‘एंन्ट्री’ केली.
आजच्या स्थायी समितीच्या बैठकीला शिवसेना सदस्य राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे सदस्य सुलक्षणा शीलवंत धर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे यांनी हेल्मेट परिधान करून प्रवेश केला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक सदस्यांनी चांगलाच राडा घातला होता. सभागृहातील माईक, प्लेट, फोन तोडफोडीचा प्रकार भाजप सदस्यांकडून करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हेल्मेट परिधान करून सभागृहात प्रवेश करत एकप्रकारे भाजपच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे.