वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची ‘त्या’ व्हायरल यादीबाबत चौकशी करण्याचे आदेश

0

मुंबई : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु राज्य सरकारने अशी कोणतीही यादी प्रसिद्ध केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची ही यादी नेमकी कोणी बाहेर लीक केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु यावर मुख्यमंत्र्यांची सही नाही. मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच कोणीतरी ही यादी सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, राज्य सरकारकडून बदल्यांची कोणतीही यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती किंवा तसा कोणताही प्रस्ताव नव्हता. कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने ही यादी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. सहा महिन्यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.

दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एका व्यक्तीने मंत्रालयात फोन करुन शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत फोनवरील व्यक्तीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी खातरजमा करण्यासाठी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.