मुंबई : उद्या 20 जूनला विधान परिषदची निवडणुक होत आहे. भाजपाने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हालचाली केल्या आणि भाजपचा 5 वा उमेदवार जिंकला, तर राज्य सरकार अडचणीत सापडू शकते. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी साधारण 26 मतांचा कोटा आवश्यक आहे. प्रत्यक्षात 11 मधील कोणता उमेदवार रिंगणाबाहेर जाणार, हे कोणत्या पक्षांची मते जास्त फूटतात त्यावर ठरेल.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणार्या या निवडणुकीत सध्या 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवारांना विजय मिळवण्यास जास्त त्रास होणार नाही. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची झाली आहे.
विधान परिषदेसाठी 288 पैकी 285 जणांचेच मतदान होणार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. शिवसेनेचे अंधेरीचे उमेदवार रमेश लटके यांचे निधन झाले आहे.
बहुजन विकास आघाडीचे तीनपैकी दोनच उमेदवार मतदान करण्याची शक्यता आहे. भाजप आमदारांची संख्या 106 असून त्यांच्या चार उमेदवारांसाठी 104 मते त्यांना द्यावी लागणार आहेत. त्यांना आठ अपक्षांचा पाठिंबा आहे.
मात्र भाजपच्या पहिल्या चार उमेदवारांना केवळ 26चाच कोटा पक्षाकडून दिला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे 5वे प्रसाद लाड यांना मिळाली तर केवळ 5 ते 6 मते पक्षाकडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जवळपास 20 मतांची पूर्तता करावी लागणार आहे.
काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना 9 ते बारा मतांची पूर्तता करावी लागेल. संख्याबळानुसार जगताप यांचे पारडे जड वाटत असले तरी गुप्त मतदानात कुणाकुणाची मते कुठे जातील, याचा अंदाज नाही. यामुळे सर्व पक्ष आमदारांना सांभाळत आहेत.
राज्य विधिमंडळात अपक्ष व छोटे-मोठे पक्ष यांची 15 मते असून ती सर्वच भाजपला मिळणे शक्य नाही. पण बहुतांश मते मिळवण्याचा भाजप जोरदार प्रयत्न करणार यात वाद नाही.
मात्र जवळपास 20 मते हवी असतानाही जर भाजपचे प्रसाद लाड या निवडणुकीत जिंकले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण या सगळ्या दिग्गजांसाठी ती मोठी नामुष्कीच असणार आहे.
तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील असंतुष्ट आमदारांना खूश करण्याचे विविध मार्ग भाजपकडे असल्याने भाजपा त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. मात्र गुप्त मतदान असल्यामुळे भाजपचीही सगळीच्या सगळी मते त्यांच्याच उमेदवाराला पडतील, याचीही शाश्वती नाही. त्यामुळे चारही बाजूंनी उलट सुलट मतांची फूट होण्याचीच शक्यता आहे.
राज्याची सत्ता हातात असताना जर फडणवीस एकहाती सत्ताधारी पक्षाची इतकी मते फोडू शकले तर त्यांचा दबदबद निर्माण होऊ शकतो. याशिवाय ते आमदारांना गळाला लावून राज्यात सत्ता बदलासाठी हालचाली करू शकतात.