पुणे : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासनाने अनेक भागात निर्बंध कमी केले. मात्र काही जिल्ह्यात निर्बंध कमी केल्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यामुळे अशी स्थिती राहिल्यास पुन्हा एकदा राज्याने नव्याने निर्बंध लावण्याचा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“रविवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्णसंख्यात जास्त झाल्याचं दिसत आहे. आपण सवलत दिल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या धीम्या गतीने वाढत आहे. संख्या जर अजून वाढली तर अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसातील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल,” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील. याशिवाय अन्य निर्बंध लागू असतील. शनिवार-रविवारी दुकाने बंद राहतील. गर्दी टाळण्याकरिता मुंबई शहराचा याच गटात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी समावेश केला आहे. मुंबईतील जोखीम टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण, प. महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती
– रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या आणि संसर्गदर जास्त, चौथ्या स्तरात समावेश.
– या जिल्ह्य़ांमध्ये सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू असेल, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव.
– शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच.
– संसर्ग कमी व्हावा या उद्देशाने अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास.