अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू : वाकडकर

0

पिंपरी : शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून गंभीर, अतिगंभीर रुग्णांना ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची गरज भासत आहे. या इंजेक्शनची तातडीची गरज असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन स्थायी समितीच्या ठराव पास होण्याची वाट पहात आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदीचा ठराव स्थगित करण्यात आला.या माध्यमातून सत्ताधारी टक्केवारीसाठी अत्यवस्थ रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवारी) महापालिका आवारात आंदोलन केले.

आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, फझल शेख आदी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका प्रवेशव्दारासमोर स्थायी समितीचा निषेध करुन निदर्शने केली. यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले.

महापालिका क्षेत्रात मागील दहा दिवसांपासून कोरोना कोविड – 19 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 7 एप्रिल रोजी 2784 रुग्ण बाधित झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 24275 पेक्षा जास्त आहे. शहरातील बहुतांशी कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत.

बहुतांशी रुग्णांना ऑक्सिजन तसेच ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची गरज भासत आहे आणि या इंजेक्शनमुळेच रुग्ण बरे होत आहेत. अशी या इंजेक्शनची तातडीची गरज असताना पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन अगतीकपणे स्थायी समितीच्या ठराव पास होण्याची वाट पहात आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदी ठराव स्थगित करण्यात आला. टक्केवारीसाठी अत्यवस्थ रुग्णांच्या जीवाशी खेळणे हे मानवतेला कलंक आहे.

शहरातील रुग्णांच्या जीवीताचा विचार करुन आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतःच्या अधिकारात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदी करावीत आणि हजारो रुग्णांना दिलासा द्यावा; अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.