ठाणे ः “छत्रपत्री संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर नाव करावे, यावर चर्चा करण्याचे कारण नाही. काही विषय असे असतात की, त्यातून वेगली वातावरण निर्मिती होऊ शकते, ती होऊ नये असे आमचे धोरण आहे. संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहेत”, असे मत महसूल मंत्री आणि काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडले.
ठाण्यातील काॅंग्रेस कार्यालयाला भेट दिली तेव्हा ते बोलत होते. थो़रात पुढे म्हणाले की, “सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आम्ही प्रत्येक वेळी योग्य पद्धत्तीने चर्चा करून निर्णय घेऊ आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू”, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षच्या पदाविषयी बोलताना थोरात म्हणाले की, “माझ्याकडे तीन महत्वाची पदे आहे, त्यामुळे सहाजिकच कोणालाही हेवा वाटणार आहे. पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते विभाजन करू शकतात. ते अनेकांना संधी देऊ शकतात. यासाठी मीदेखील तयार आहे. तरुण मंडळींना संधी द्या आणि नेतृत्व घडवा”, असेही थोरात यांनी सांगितले.