पुणे : पोलिसांसमोर बालगुन्हेगारी रोखणे मोठे आवाहन आहे. राष्ट्रीय बालगुन्हेगारी विषयी वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणांच्या निष्कर्षातून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. याचा विचार केल्यास कुटुंबात होणारे अती लाड, संस्कारांचा आणि शिस्तीचा अभाव यातूनच बालगुन्हेगारी उदयास येत आहे. हे रोखण्यासाठी पालकांनी वेळीच जागे होऊन आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
रेवांशी ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था, टॉक टू मी व विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित ‘विधीसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन’ या बाल अपराधींच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे या चार दिवसीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्ण प्रकाश म्हणाले की, “आपण स्वार्थापुढे बाकी सर्व काही विसरतो आणि आपल्याच लोकांचे रक्त प्यायलाही कमी करत नाही. बालगुन्हेगार घडण्यामागे बरीच करणे आहेत. त्यात प्रामुख्याने आवेगावर ताबा नसणे, चुकीचे संस्कार, व्यसने इत्यादी आहेत. सर्वेक्षणानुसार बालगुन्हेगारात ९९ टक्के मुलांचे प्रमाण आहे. यामागचे कारण आपल्या पुरुषप्रधान संस्कुतीची मानसिकता आहे.
सर्वेश जावडेकर म्हणाले, “नोकरी मागणाऱ्यापेक्षा अजून ४ लोकांना नोकरी देणारे बनण्याच्या दृष्टीने विचार करावा. कोणताही व्यवसाय फळास येण्यासाठी संय्यम ठेवून स्वतःला १५ वर्षांचा काळ द्यायला हवा. जर तुमच्याकडे भक्ती, शक्ती आणि युक्ती असेल तर यश तुम्हाला नक्कीच मिळते. फक्त व्यसनांना स्वतःपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.”