मुंबई: मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असून राज्यातील नव्याने आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये सुमारे ६० टक्के रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत बुधवारी ११२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. फेब्रुवारीनंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्या एवढय़ा मोठय़ा संख्येने आढळली आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही आता १५०च्या वर गेला आहे. बुधवारी राज्यात १८६ रुग्ण नव्याने आढळले आहेत.
राज्यात रुग्णसंख्या वाढली असली तरी मृतांचे प्रमाण अत्यल्पच असून बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढीचा परिणाम उपचाराधीन रुग्णांच्या संख्येवरही झाला आहे. परिणामी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ९५५ वर तर मुंबईतील रुग्णसंख्या ५६३ वर गेली आहे.
रुग्णसंख्या वाढ होत असली तरी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे. बुधवारी राज्यात १७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर मुंबईत हे प्रमाण ९८ आहे. मुंबईत बुधवारी आढळलेल्या ११२ रुग्णांपैकी एकाच रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मुंबईत सध्या १७ रुग्ण रुग्णालयात आहेत.