पाबळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारणार!
आमदार लांडगे यांची शहरासह ग्रामीण भागालाही मदत
शिरुर : कोरोना महामारीच्या काळात शहरातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी धडपड करणारे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही ‘मदतीचा हात’ दिला आहे. पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ३९ गावांमधील रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातील नमांकीत अशा टिचिंग लर्निंग कम्युनिटी ग्रुपच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्लँट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुमारे ४५ लाख रुपये किमतीचा हा प्लँट असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्याबाबत जागेची पाहणी करण्यासाठी आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने पाबळला भेट दिली.
यावेळी गावाचे सरपंच मारुती शेळके, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, उपसरपंच राजेंद्र वाघोले, माजी सरपंच सोपान जाधव, माजी सरपंच पोपट जाधव व ग्रामस्थ सुनील वाघोले उपस्थित होते.
तसेच, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, टीसीएल ग्रुपचे इरफान आवटे, सचिन संगमनेरकर, डी. के. साळुंखे , अविनाश मानकर, चंद्रशेखर कुलकर्णी, दिलीप आंबेकर, अनोखी संगमनेरकर व भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष निखिल काळकुटे यांनी जागेची पाहणी केली. तसेच, प्लँट उभारण्याबाबत नियोजन आरखडा तयार केला आहे.
याबाबत टीएलसी ग्रुपचे इरफान आवटे म्हणाले की, भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली टिचिंग लर्निंग कम्युनिटी ग्रुप (TLC) यांच्या माध्यमातून पाबळ ग्रामीण कोविड रुग्णालास भेट देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी कंपनी सोशल रिस्पॉसिबिलिटी (CSR)फंडाचा वापर केला जाणार आहे. ग्रामीण भागातील या रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारल्यामुळे जवळपासच्या ३९ गावांतील रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी गावात TLC ग्रुप ने गावांमध्ये भेट देऊन सरपंच ग्राम सदस्य व हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच, २० ते २५ दिवसांत प्लँट कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. या प्लँटची क्षमता एकूण ५० बेडला ऑक्सिजन पुरवठा करण्याची आहे.
काय आहे ‘टीएलसी’?
संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदित उद्योजकांनी एकत्र येवून टिचिंग लर्निंग कम्युनिटी ग्रुपची स्थापना केली आहे. यामध्ये नाशिक, औरंगाबाद, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ७०० नवउद्योजकांचा समावेश आहे. पुण्यातील सुमारे १५० नवोदित उद्योजकांनी कोविड काळात काहीतरी समाजपयोगी प्रकल्पासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत सुमारे १०० ऑक्सिजन सिलिंडर, ४ व्हेंटिलेटर आणि १ ऑक्सिजन जनरेशन प्लँट ‘सीएसआर’ फंडातून देण्याबाबत नियोजन केले आहे.