पुणे : पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा- ए – तकबीर, अल्लाह – हू – अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. भाजप आमदार नीतेश राणे आणि राम सातपुते यांनी ट्विट करत हा आरोप केला. मात्र, पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
‘पीएफआय’विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन करण्याचे करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. यावेळी अनेकांना अटक करण्यात आली.
भाजपचे आमदार राम सातपुते यांनी याप्रकरणी एक व्हिडिओ ट्विट करत थेट आरोप केले आहेत. ते म्हणाले, पुण्यात ‘पीएफआय’च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत. देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये. कठोर कारवाई करावी.
भाजप आमदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नीतेश राणे यांनी देखील ट्विट करत तसेच व्हिडीओ जारी करत आरोप केले आहेत. राणे म्हणाले, ‘पीएफआय’च्या समर्थनार्थ काही नालायकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले. हे लोक विसरले असतील की आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. देशाच्या विरोधी कोणीही अशाप्रकारचे नारे देत असतील तर अशा पद्धतीच्या देशद्रोह्यांना शिक्षा झालीच पाहिजे, हे पोलिस खात्याने लक्षात ठेवावे. या लोकांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी. अशाप्रकारची हिम्मत पुन्हा कोणाकडून होता कामा नये. असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र, हे आरोप नाकारले आहेत. त्याचप्रमाणे ‘पीएफआय’च्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे पुण्याचे डीसीपी सागर पाटील यांनी म्हटले आहे. बेकायदेशीरपणे जमावाविरुद्ध ‘पीएफआय’वर मात्र गुन्हा दाखल दाखल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.