मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोरप्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांना दंड बजावण्यात आला आहे. 5 हजार रुपये मुख्यमंत्री कोव्हिड निधीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. याबाबत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जबाब नोंदवला आहे. आयोगाने समन्स बजावून सचिन वाझेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी स्वतः सचिन वाझेचा जबाब नोंदवला.
चांदिवाल समितीस चौकशी आयोग अधिनियम 1952 मधील कलम 4,5 अ, 8,9 नुसार दिवाणी आणि अनुषंगिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास ही समिती याप्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर संस्थांकडे सोपवण्याची शिफारस करु शकते.