मुंबई : 3 कोटी खंडणी प्रकरणी आरोपी संजय पुनामीयाला अटक करण्यात आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सोनू जालान, रियाज भाटिया आणि केतन तन्ना यांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात पहिली अटक संजय पुनामियाला झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, परमबीर सिंह यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात 6 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये डीसीपी अकबर पठाण यांचेही नाव आहे. देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. तेव्हापासून सिंह सातत्याने चर्चेच्या वर्तुळात आहेत.