नवी दिल्ली : देशाचं सत्ताकेंद्र असलेल्या राजधानी दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधी विरोधी पक्षांची एकजूट बांधताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसत आहे. या भेटीगाठींमागे उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका असल्याचंही बोललं जात असून, राजदचे नेते लालू प्रसार यादव हे दिल्लीत असून, त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. या सर्व दौऱ्यासंदर्भात बोलताना लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीबद्दलही भाष्य केलं.
सध्या दिल्ली मुक्कामी असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांची भेट घेतली. राजकीय भेट सुरू असतानाच त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बिहारमधील परिस्थितीबद्दल विचारण्यात आलं. विशेष लोजपामध्ये उफाळून आलेल्या बंडाळीबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
यासर्व प्रश्नांवर बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले,”लोक जनशक्ती पार्टीमध्ये जे काही घडलं, त्यानंतरही मला असं वाटतं की, चिराग पासवान हेच लोजपाचे नेते आहेत”, अशी भूमिका त्यांनी मांडली. चिराग पासवान-तेजस्वी यादव एकत्र येण्याबद्दल ते म्हणाले,”हो, मला वाटतं ते एकत्र येतील. आम्ही बिहारमध्ये सरकार स्थापन करणार होतो. मी तुरूंगात होतो, पण माझा मुलगा तेजस्वी त्यांच्याशी (भाजपा-जदयू) एकटा लढला. त्यांनी धोका दिला, आम्हाला १०-१५ मतांनी हरवलं”, असं मत लालू प्रसाद यांनी मांडलं.
“शरद पवार यांची प्रकृती बरी नव्हती. मी त्यांना भेटण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. शरद पवारांशिवाय संसद शांत वाटत आहे. मी, शरद पवार आणि मुलायम सिंह यादव असे आम्ही तिघे खुप वर्ष वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी राजकीय लढा दिला. काल मी मुलायम सिंह यादव यांचीही सदिच्छा भेट घेतली”, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.