पिंपरी : पुणे-पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना वाहतुक कोंडीचा प्रश्न नवीन नाही. यातही सगळ्यात जास्त प्रश्न भेडसावतो तो पिंपरी-चिंचवडला. सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी पिंपरीमध्ये आयटी पार्क हिंजवडीकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्याचा मोठा फटका लागूनच असलेल्या वाकडला बसतो. वाहतूक नियमांचा भंग हि गोष्ट तर उद्योगनगरीत पुण्यापेक्षा अधिक होत असल्याचे पाहायला मिळते. रात्री ८ नंतर ‘वन वे’ चा ‘टू वे’ कधी होते, ते कळतही नाही. ‘नो एंट्री’त सर्रास वाहने घुसवली जात असल्याचे चित्र नियमीत दिसते.
पिंपरीकरांच्या याच प्रश्नांकडे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी लक्ष वेधले आहे. वाहतूक नियमभंग व वाहतूक कोंडी हे पिंपरी-चिंचवडकरांच्या पाचवीलाच पूजली असल्याचे कटू सत्य त्यांनी मांडले आहे. यानिमित्ताने त्यांचे शहर व परिसरातील प्रश्नांवर बारीक लक्ष असते, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे.
शहरातील वाहतूक समस्येवर पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने पिंपरी-चिंचवड पोलिस, शिवसेनेचे स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना टॅग करत एक उपहासात्मक ट्विट रात्री केले. आशिया खंडातील तथाकथित श्रीमंत महापालिका पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा, अशी सुरवात करत शहरातील वाहतूक समस्येला वाली नसल्याची खंत फेडरेशनने व्यक्त केली.
कोणाला काळजी नाही. हिंजवडीकडून येताना-जाताना लागणाऱ्या भूमकर आणि डांगे चौकात, तर गोंधळात गोंधळ असून वाहतुकीचा विचका झाल्याचे चित्र आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. पिंपरी चौकातील सिग्नलवर टायमर नसल्याने एकही जण गाडी बंद करीत नाही, त्यामुळे प्रदूषणात तर भर पडतेच. शिवाय इंधन जळून खिशालाही चाट बसते. मोबाईलवर बोलत गाडी चालविणाऱ्या शहरातील दुचाकीस्वारांना तर कसलेच भय नाही. शहरात सगळीकडे हे चित्र दिसते. स्वतःसह दुसऱ्याचाही जीव धोक्यात आणणाऱ्या अशा बाईकस्वारांविरुद्ध कडक कारवाई होत नसल्याकडेही अन्य ट्विटव्दारे फेडरेशनने लक्ष वेधले होते.
दरम्यान मंगळवारी पुन्हा शहरात हिंजवडी-वाकड रस्त्यावरील काळाखडक चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ती सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले. शहरातील वाहतूक कोंडीच्या याच प्रश्नांची दखल घेत पार्थ यांनी या समस्येकडे सबंधितांचे लक्ष काल वेधले. वाहतूक नियमांची पायमल्ली आणि कोंडी हे पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवन बनले आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
या प्रश्नाकडे लक्ष वेधताना त्यावरील उपायही त्यांनी सांगितला. चांगला शेजारधर्म निभावण्यासाठी किमान सीसीटीव्ही बसवू शकतो. रहिवाशांचे जगणं सुस्थितीत ठेवण्यासाठी याला आपलं प्राधान्य असले पाहिजे,असे त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस,पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश,वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त आणि फेडरेशनला टॅग केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पिंपरीच्या कारभाऱ्यांचे हे पाऊल बेफिकीर, निंदनीय : पार्थ पवारांनी धरले धारेवर याआधीही कोरोना निधी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पिंपरी महापालिकेने वळवल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यावरही हे पालिकेचे बेफिकीरीचे पाऊल निंदनीय असल्याची कडाडून टीका करीत त्यांनी पालिकेला धारेवर धरले होते. त्यामुळे एकूणच पिंपरी चिंडवडच्या प्रश्नांकडे पार्थ पवारांचे बारिक लक्ष असल्याचे सातत्याने दिसून येते.