रेमडेसिविर औषधामुळे रुग्णांना झाला त्रास

0

मुंबई : ‘हेटेरो हेल्थकेअर’ या कंपनीकडून पुरवठा करण्यात आलेल्या रेमडेसिविर औषधामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी गुरुवारी राज्यातील अनेक भागांतून आल्या आहेत.

पालघरमध्ये बुधवारी पुरवठा केलेल्या रेमडेसिविरच्या ६५० कुप्यांचा वापर न करण्याचे कंपनीने जाहीर केले होते. पण हा आदेश मिळण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांनी २३२ रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर केला. त्यामुळे १३ रुग्णांना त्रास झाला. शरीराला कंप सुटत असल्याचे या रुग्णांनी सांगितले.

रायगडमध्ये रेमडेसिविरच्या ५०० कुप्या देण्यात आल्या  होत्या. त्यापैकी १२० कुप्या रुग्णांना देण्यात आल्या. यातील ९० जणांना इंजेक्शन घेतल्यावर त्रास जाणवला. तर पुण्यात दोन हजार १५५ कुप्या वितरित झाल्या होत्या. त्यातील काही कुप्या रुग्णांसाठी वापरण्यात आल्यानंतर त्यांना त्रास झाला.

रायगड जिल्ह््यात ‘हेटेरो हेल्थ केअर’ कंपनीकडून वितरित करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. तर या इंजेक्शन्सचा पुरवठा पुणे शहरासह जिल्ह््यात तूर्त थांबवण्यात आला असून या तक्रारीबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कंपनीकडे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

हेटेरो हेल्थकेअर कंपनीच्या औषधाचे पालघरमध्ये वितरण झाले होते. तांत्रिक कारणामुळे या औषधाचा वापर करू नका, अशी सूचना कंपनीने केली होती. मात्र रेमडेसिविरचा तुटवडा असल्याने जिल्ह््यातील रुग्णालयांनी हे औषध तातडीने रुग्णांना दिले. त्यात २३२ रुग्णांपैकी १३ जणांना अंग थरथरण्याचा त्रास काही काळ जाणवला. रायगडमधील ९० जणांना त्रास झाला, तर पुण्यातही काही विभागांतून या औषधामुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.

Leave A Reply

Your email address will not be published.