मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असतानाच आता म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (ब्लॅक फंगस) या आजारानेही डोकं वर काढलं आहे. राज्यात म्युकरकायकोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यात अनेक रुग्ण दगावत आहेत. अशावेळी राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत.
त्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने म्युकरमायकोसिसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिस या आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला असल्याची माहिती दिली होती. तसंच या रुग्णांवरील उपचारासाठी आणि औषधांसाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत घोषणा करतानाच टोपे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. देशात आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती.
ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसनेही देशात थैमान घातले आहे. त्यानंतर आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. या येलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. 34 वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.