पुणे : भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मोक्काच्या गुन्ह्यात अडविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करुन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण त्यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन होते. याप्रकरणी आता अॅड. प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, अॅड. प्रवीण चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तेजस मोरे याच्याविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. विना परवाना आपल्या कार्यालयात छुपा कॅमेरा बसवून त्याने हे चित्रिकरण केले आहे. त्यामुळे आपल्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे त्यात म्हटले आहे. तक्रार अर्जाची चौकशी होऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रवीण चव्हाण हे बीआरएच तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करत होते. हे प्रकरण उद्भवल्यानंतर त्यांनी राज्य शासनाकडे विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिला आहे.
प्रवीण चव्हाण यांच्या मॉर्डन कॉलनी येथील कार्यालयात घड्याळामध्ये स्पाय कॅमेरा लपवून त्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते. ते उघड झाल्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी हा सर्व प्रकार जळगावमधील लोकांना हाताशी धरुन तेजस मोरे याने केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांनी अधिकृत तक्रार दिली आहे.
दरम्यान, तेजस मोरे यांनी आपण घड्याळ भेट दिले नसल्याचा खुलासा केला असून आपल्याला प्रवीण चव्हाण यांनी जामीन मिळवून दिल्याने त्यांना आपण देव मानत होतो. परंतु, त्यांनी आपल्याकडून बेकायदेशीर कामे करुन घेतली.
या स्टिंग ऑपरेशनमुळे त्यांचा काळा चेहरा सर्वांसमोर आल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.