मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. आज सलग 100 तासांपासून आयकर विभागाची धाड सुरु असल्याचे सुत्रांकडून समजतेय. पार्थ पवार यांच्या कार्यालय कागद पत्रांची पडताळणी सुरुच आहे. नरीमन पॉईंट येथील निर्मल भवन इथल्या सीड ट्री इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही छापेमारी सुरु आहे.
अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सध्या आयकर विभागाकडून धाडीसत्र सुरु आहे. यात आयकर विभागानं पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नंदूरबार आणि मुंबईत धाडी मारल्या आहेत. पार्थ पवारांच्या मुंबईतल्या कार्यालयात आयटीकडून सलग चौथ्या दिवशी कारवाई असल्याचे समजतेय. आज (रविवार) साकाळी पुन्हा सात वाजल्यापासून आयकर अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. यावेळी कार्यालयात 6 ते 7 अधिकारी अजूनही कारवाई करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पार्थ पवारांच्या कार्यालयात आयकर विभागाचे सर्व कर्मचारी तयारीनिशी दाखल झाले. आयटीच्या अधिकाऱ्यांनी काल फोल्डर आणि अतिरिक्त एनव्हलप मागवल्याची माहिती आहे. पार्थ पवारांच्या कार्यालयात आयकर विभागाच्या सात ते आठ अधिकाऱ्यांनी तीन रात्र घालवल्या आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली. नंदुरबारमधील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर करखान्यावरही छापा टाकण्यात आला होता. तब्बल 70 तासानंतर आयटी विभागाचे पथक कारखान्या बाहेर आले आहे. तीन दिवसानंतर करावाई संपुष्टात आली आहे. काल 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या कारखान्यातून बाहेर पडल्या आहेत. या कारवाईत नेमकं काय मिळालं याबाबत बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.