नवी दिल्ली : वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून हि मोठी माहिती दिली आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आता पेट्रोल 9.5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर डिझेलही 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला सुमारे एक लाख कोटी रुपयांचे वजन पडणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व राज्य सरकारांना व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विशेषत: त्या राज्यांना किंमत कमी करण्यास सांगितले आहे, ज्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये व्हॅट कमी केलेला नाही.
इतकेच नव्हे, तर मोदी सरकारने यावर्षी पीएम उज्ज्वला योजनेच्या सुमारे 9 कोटी लाभार्थ्यांना गॅस सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलेंडरमागे 200 रुपये सबसिडी देणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. निर्मला सीतारामन यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, यामुळे माता-भगिनींना खूप मदत होईल. यामुळे सरकारला वर्षाला सुमारे 6100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
लोक दीर्घकाळ महागाईने त्रस्त आहेत. महागाईचा दर 7 टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याची स्थिती आहे. रिझर्व्ह बँकेला रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करावी लागली आहे. केवळ डिझेल-पेट्रोल किंवा गॅसच नाही तर खाद्यतेल, भाजीपाला, गहू, धान्य, सर्वच वस्तू महाग होत आहेत, त्यामुळे जनतेचा खर्च खूप वाढला आहे. अशा परिस्थितीत डिझेल-पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय म्हणजे जनतेला मोठा दिलासा देण्यासारखा आहे.