राष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडची ओळख ‘मेट्रो सिटी’

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विश्वास

0

पिंपरी : पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो, पंतप्रधान आवास योजना, पालखी मार्ग विकास, नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर, मुंबई द्रूतगती महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय सफारी पार्क असे शाश्वत विकासाचे प्रकल्प आणि महत्त्वाकांक्षी योजनांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची ओळख राष्ट्रीय पातळीवर ‘मेट्रो सिटी’ म्हणून अधोरेखित होत आहे, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

‘मेट्रो सिटी पिंपरी-चिंचवड’ या संकल्पनेसंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला. यावेळी विविध प्रकल्प, योजना, प्रस्तावित विकासकामे यावर प्रकाश टाकला आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की,  देशातील वाढते नागरिकरण लक्षात घेता देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी केली. बदलत्या काळानुसार, सुरक्षित, विश्वासार्ह, कार्यक्षम, परवडणारी, प्रवासी अनुकूल आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ व जलद सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था प्रदान करणे ही काळाजी गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पुढाकाराने २०१६ साली पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे, मार्च २०२२ मध्ये  या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पणही झाले.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक व सार्वजनिक प्रवासी सुविधा लक्षात घेता दोन्ही शहरातील नागरिक मेट्रो प्रकल्पाची आतुरतेने वाट पाहत होते. खरंतर.. २००० साली मेट्रोबाबत चर्चा सुरू झाली होती.  मात्र, मोदी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली. पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो सुविधा सुरू होईल, असे त्यावेळी आपल्याला स्वप्नवत वाटत होते. मात्र, सर्व पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीने हे शक्य झाले.
***
मेट्रोचा १ कोटीहून अधिक नागरिकांना फायदा…
सुरूवातीला स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेचे पहिल्या टप्प्यात काम हाती घेण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या मागणीनुसार, पिंपरी ते निगडी या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेचेही काम प्रगतीपथावर आहे. माझ्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडची ‘कनेक्टिव्हीटी’ सक्षम करण्यासाठी मेट्रो सुविधा ‘माईलस्टोन’ ठरली आहे. मेट्रो सुविधेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य शहरातील सुमारे १ कोटीहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा फायदा होत आहे. शहराच्या विकासामध्ये हा प्रकल्प शाश्वत विकासाचे प्रतिक राहील, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
**
मेट्रोच्या प्रस्तावित मार्गिकांसाठी पाठपुरावा…
आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराचा भौगोलिक विस्तार व लोकवस्ती आणि औद्योगिक पट्टयाची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने हिंजवडी- वाकड- पिंपळे सौदागर- नाशिक फाटा- भोसरी- चाकण आणि हिंजवडी- ताथवडे- पुनावळे- किवळे-रावेत- निगडी मार्गे चाकण आणि निगडी- त्रिवेणीनगर- कृष्णानगर- संतनगर- मोशी- चऱ्होलीमार्गे वाघोली (90 मी. रस्त्याने) असा मेट्रो सुविधेचा विस्तार व्हावा. या करीता राज्य व केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करीत आहोत, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.
***
१० वर्षांत २६ उद्यानांचा विकास…
‘‘ग्रीन सिटी… क्लिन सिटी’’ असा आपला सुरूवातीपासून संकल्प राहिला आहे. शहरात २०१४ पर्यंत एकूण ४३ उद्याने होती.  गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये २६ नवीन उद्याने विकसित करण्यात आली आहे. पुणे-नाशिक एलिव्हेडेट कॉरिडॉरला केंद्र सरकारकडून ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे नाशिक फाटा ते खेड पर्यंत प्रवास जलद आणि भोसरी-मोशी-चिखली- तळवडे परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. शहराच्या औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. मुकाई चौक-भक्ती-शक्ती चौक-जयगणेश साम्राज्य चौक – चऱ्होली मार्गे वाघोली (मुंबई द्रूतगती महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग कॉरिडॉर) असा कॉरिडॉर प्रगतीपथावर आहे.
***
वाहतूक सक्षमीकरणाचा निर्धार…
मोशीत आंतरराष्ट्रीय सफारी पार्क प्रस्तावित असून, त्यामुळे पर्यटन व रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होणार आहेत. श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा  पालखी महामार्गाचे काम आपल्या कार्यकाळात पूर्ण झाले. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक समस्या व अपघाताची संख्याही कमी झालेली आहे. यासह तळवडे ते चऱ्होली नदी पात्रातील रस्ता करण्याबाबत मी आग्रही आहे. तसे झाल्यास देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. वाहतूक सक्षमीकरणाचा निर्धार आम्ही केला आहे, असा दावा आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. w

***

ऑटो हब, इंडस्ट्रिअल हब, आयटी सिटी, स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड आता ‘मेट्रो सिटी’ होण्याकामी आम्ही पुढाकार घेणार, असे आश्वासन पिंपरी-चिंचवडकरांना दिले होते. त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहोत. २०१४ विधानसभा, २०१७ मध्ये महानगरपालिका आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत आपण पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वास दाखवला. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रमाणिकपणे काम करीत आहे. शहर आता मेट्रो सिटी म्हणून उदयाला आले, ही अभिमानाची बाब आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave A Reply

Your email address will not be published.