‘एसीबी’च्या जाळ्यात पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांसह पाचजण

'वर्क ऑर्डर'साठी करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी मागितली 10 लाखाची लाच

0
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) छापा टाकला. 10 लाखाच्या मागणी नंतर 6 लाख रुपयांच्या तडजोडीच्या चौकशीनंतर एक लाख 18 हजार रुपयांची लाच स्विकारली. या प्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.  महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर छापा पडला असून शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटातही प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (बुधवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास सुरु झाली.

 

 

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. दुपारी तीन वाजता आजची स्थायी समितीची ऑनलाइन सभा संपली. आजच्या सभेत तब्बल 31 कोटी 66 लाख 89 हजार 607 रुपयांच्या विषयाला मान्यता देण्यात आली.  साडेचारच्या सुमारास  पदाधिकारी  कार्यालयात आले. त्याचदरम्यान स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी तळमजल्यावर लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना तिसऱ्या मजल्यावर घेऊन आले.

 

 

स्थायी समितीच्या दालनात त्यांना घेऊन गेले. दालन बंद करून घेत त्यांची चौकशी सुरू केली. त्यांच्यासह इतर दोघांचीही कसून चौकशी केली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष  अ‍ॅड. नितीन लांडगे यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्वीय सहाय्यक पिंगळे आणि दोन कर्मचा-यांना एसीबीचे अधिकारी मोटारीतून घेऊन गेले. त्यापाठोपाठ स्थायी समिती अध्यक्ष  अ‍ॅड. नितीन लांडगे यांनाही पावणेसातच्या सुमारास एसीबीचे अधिकारी त्यांच्या दालनातून खाली घेऊन आले आणि त्यांना मोटारीतून घेऊन गेले.

 

 

या लाच प्रकरणामुळे महापालिका वर्तुळासह शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.  कारवाई दरम्यान महापालिका भवनात, परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.

 

 

महापालिकेच्या जागेमध्ये होर्डिंग उभा करण्यासाठी 28 निविदा मंजूर झाल्या होत्या. मात्र त्याची वर्क ऑर्डर निघत नव्हती. म्हणून तक्रारदार स्थायी समिती अध्यक्ष लांडगे आणि स्वीय सहायक पिंगळे यांना भेटले. त्यावेळी या वर्क ऑर्डर वर स्वाक्षरी करण्यासाठी 3 टक्के प्रमाणे 10 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडी नंतर 6 लाख ददेण्याचे ठरले. पैकी 6 वर्क ऑर्डर वर स्वाक्षरी करण्यासाठी आज 2 टक्क्याप्रमाणे 1 लाख 18 हजार देण्याचे ठरले.

 

 

दरम्यान 24 वर्षीय तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागास याची माहिती दिली. या पथकाने सापळा रचून रोख रक्कम स्वीकारताना लिपिक विजय चावरीया, राजेंद्र शिंदे, अरविंद कांबळे यांना रंगेहाथ पकडले. त्यानुसार अध्यक्ष ऍड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरीया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भीमराव कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.