पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी झाली. या परीक्षेचा निकाल 6 डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. शारीरिक चाचणी 10 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 720 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. भरतीच्या पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर या सहा जिल्ह्यात ही लेखी परीक्षा झाली. भरतीसाठी एक लाख 89 हजार 732 उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले. त्यातील 82 हजार 608 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर एक लाख सात हजार 124 उमेदवार परीक्षेसाठी गैरहजर राहिले.
या परीक्षेचा वर्गावरीनुसार 6 डिसेंबर रोजी निकाल प्रसिद्ध झाला. त्यामध्ये एकास दहा या प्रमाणे 11 हजार 534 उमेदवारांची कट ऑफ लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची 10 डिसेंबर सकाळी साडेपाच पासून केली जाणार आहे.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन वानवडी, हडपसर पुणे येथे पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे.
12 डिसेंबर वगळता 10 ते 16 डिसेंबर या कालावधीत पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. 17 आणि 18 डिसेंबर रोजी महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र पडताळणी होईल. तर 20 डिसेंबर रोजी केवळ माजी सैनिकांची चाचणी होणार आहे.
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.pcpc.gov.in, www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार. लेखी परिक्षेपूर्वी आणि त्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. लेखी परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने 780 प्रश्न आले होते. त्या सर्व प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले आहे. चोख व्यवस्था करून लेखी परीक्षा घेतली आहे. आता पुढील प्रक्रिया देखील अशाच चोख पद्धतीने केली जाणार आहे. रनिंगसाठी टायमिंग चिप लावण्यात येणार आहे. त्यामुळे कुणालाही त्यात अफरातफर करता येणार नाही.”
“भरती करण्यासाठी उमेदवारांना जर कुणी प्रलोभन दाखवले तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पोकोस महासंचालक यांच्याकडे उमेदवार तक्रार करू शकतात, असे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
शारीरिक मोजमाप आणि उमेदवारांसाठी सूचना –
# लेखी परिक्षेमध्ये पात्र (Qualified) झालेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर यादीस अनुसरुन पात्र उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीचे वेळापत्रक वरील प्रमाणे दिलेले आहे. तरी संबंधित उमेदवारांनी आवेदन अर्ज, तसेच आवेदन अर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे सर्व मूळ व साक्षांकित केलेले कागदपत्र, अलिकडील काळातील पासपोर्ट साईज 10 फोटो व शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्रासह दिलेल्या तारखेस सकाळी साडेपाच वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन वानवडी येथील मुख्य प्रवेशद्वारानेच उमेदवार यांना प्रवेश देण्यात येईल.
# उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
# उमेदवारांना मैदानामध्ये प्रवेश देतेवेळी बायोमॅट्रिक पध्दतीने उपस्थिती घेण्यात येणार आहे.
# उमेदवारांची ओळख पटविण्याकरीता लेखी परिक्षेच्या हॉलतिकीट वर लावण्यात आलेले फोटोवरुन व माहितीवरुन खात्री करण्यात येणार आहे.
# सर्व पोलीस भरती प्रक्रिया ही सीसीटिव्ही/कॅमेराचे सर्व्हेक्षणाखाली घेण्यात येणार आहे.
# उमेदवारांनी लेखी परिक्षेकरिता डाऊनलोड केलेले प्रवेशपत्र (Hall Tickit) सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. त्याशिवाय मैदानात पुढील चाचणीकरीता प्रवेश दिला जाणार नाही.