तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आताच नियोजन करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी आतापासूनच नियोजन करा. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या.
राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केले. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे, मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल. तसेच जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे, असेही ते म्हणालेत.
आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्ह्णून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा.
यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की , ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे. येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल याचेही चांगले नियोजन करावे.