पुणे : बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून शासनाच्या खेळाडू कोट्यातून नोकरी मिळवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात हिंजवडी पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणाऱ्या खेळाडूला अटक केली आहे. या प्रकरणात अनेक तोतया खेळाडू पोलिसांच्या गळाला लागणार आहेत.
प्रभाकर धोंडिबा गाडेकर असे बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून राज्य शासनाच्या पाच टक्के कोट्यातून शासकीय नोकरी लाटणाऱ्या तोतया खेळाडूचे नाव आहे. सेपाक टकरॉव या खेळातील नाशिक जिल्हा संघातील बोगस प्रमाणपत्राच्या आधारे प्रभाकर गाडेकर याने नगर येथील शासकीय कोषागार कार्यालयात २०१९मध्ये लिपिकाची नोकरी मिळविली होती. हा तोतया खेळाडू जालना जिल्ह्यातील आहे.
नाशिकमधील अन्याय झालेल्या खेळाडूंनी गतवर्षी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. बकोरिया यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातल्याने अखेर या तक्रारीची दखल हिंजवडी पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल केला होता. हिंजवडी पोलिसांनी तपास करत असताना ४ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सेपाक टकरॉव संघटनेचे पदाधिकारी कृणाल आहिरे यांना अटक केली होती. त्यानंतर प्रभाकर गाडेकर या तोतया खेळाडूला अटक झाली आहे.
बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या या गोरखधंद्यात अनेक मोठी नावेही पुढे येण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इतर बोगस खेळाडू व काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत हिंजवडी पोलिसांनी दिले आहेत.