माझे राजकीय करियर संपवण्याचा डाव : पंकजा मुंडे

0

मुंबई : 2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, त्या नंतर अनेक वेळा मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र, मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या, त्याकडेही मी गांभीर्याने पाहिले नाही. असे म्हणत माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. पाठित खंजीर खुपसण्याचे माझ्या रक्तात नसल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

राहुल गांधी यांना प्रत्यक्षात समोरा-समोर मी आजपर्यंत पाहिले नाही. सोनिया गांधी आणि मी भेटलेले नाही. मी लपून छपून काम करत नाही. मी कोणताही निर्णय मी लपून घेत नाही, जो निर्णय घेईन तो उघडपणे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही माध्यमांनी माझ्या बाबत खोटी माहिती दाखवली. मी शपथेवर सांगते की, मी गांधी परिवारला वैयक्तिक ओळखतही नाही. त्यामुळे चूकीची माहिती देणाऱ्या माध्यमांविरोधात मी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांवरही त्यांनी टीका केले.

पुढील एक ते दोन महिने मी ब्रेक घेणार आहे. तसेच अंतर्मुख होऊन विचार करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. माझ्या पक्षाला माझ्या बद्दल सन्मान वाटला असेल, माझ्यासाठी पक्षाचा निर्णय अंतिम असेल असेही त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असून त्या लवकरच पक्षांतर करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. या संदर्भात राज्यात नव्याने दाखल झालेल्या बीआरएस पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. तर पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्हाला आनंदच होईल, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले होते. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील काँग्रेस पक्ष पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या सर्व शक्यता त्यांनी फेटाळल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.