नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांनी मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कॅबिनेट सेक्रेटरी पदाहून निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधानांनी पीके सिन्हा यांना प्रिंसिपल अॅडव्हायजर म्हणून नियुक्त केलं होतं. 11 सप्टेंबर 2019मध्ये सिन्हा यांची प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. सिन्हा यांनी 13 जून 2015 ते 30 ऑगस्ट 2019 पर्यंत ते मंत्रिमंडळ सचिव म्हणून कार्यरत होते.
सिन्हा हे उत्तर प्रदेशच्या कॅडरचे 1977च्या बॅचचे अधिकारी होते. त्यांनी विद्युत आणि जहाजबांधणी मंत्रालायचे सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालायचे विशेष सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे.
सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्र विषयातच पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर नोकरीलाच असतानाच लोक प्रशासन विषयात डिप्लोमा केला होता. तसेच समाजशास्त्रात एमफिल केलं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी उत्तर प्रदेशासह केंद्राच्या विविध पदांवर महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे.