पुणे : हांडेवाडी-कात्रज बायपासवर पीएमपीएमएल बस चालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
गौतम मच्छिंद्र साळुंखे (रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे या चालकाचे नाव आहे. साळुंखे हे स्वारगेट डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे यांनी शनिवारी (दि.10) स्वारगेट ते धायरी या मार्गावर ड्युटी केली. ड्युटी संपल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास बस डेपोमध्ये जमा केली. त्यानंतर त्यांचा आज सकाळी कात्रज बायपास या ठिकाणी मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. साळुंखे यांचा खुन कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.