पुणे: कोरोनाकाळात सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटनस्थळी गर्दी करु नका, असे वारंवार सांगूनही अनेकजण सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच काही अतिउत्साही पर्यटकांना पुणे पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेकजण सहली काढत आहेत.
सिंहगड हा अशा लोकांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. त्यानंतही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे.
पुणे पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी 88500 रुपयांचा दंड वसूल केला. एकूण 177 जणांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.